पुणे : दस्त नोंदणीच्या मुद्रांक शुल्क आकारणीसाठी ई-मूल्यांकन प्रणालीची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा 1 जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला आहे. ई-मूल्यांकन प्रणालीद्वारे नागरिकांना नोंदणी कार्यालयात न जाता घरबसल्या मिळकतीचे बाजारमूल्य जाणून घेता येणार आहे.
दस्त नोंदणीच्या मुद्रांक शुल्क आकारणी करताना मूल्यांकनासाठी मार्गदर्शक सूचना तांत्रिक स्वरुपाच्या असतात. त्यामुळे नागरिकांना दुय्यम निबंधक अथवा अन्य नोंदणी कार्यालयाकडे संपर्क साधून मूल्यांकन व त्यावर मुद्रांक शुल्क आकारणीची रक्कम निश्चित करुन घ्यावी लागत होती. मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी प्रथमत: 2018-19 मध्ये ई-मूल्यांकन प्रणाली नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित महाराष्ट्रासाठी ई-मूल्यांकन प्रणालीची सुविधा नागरिकांना 1 जानेवारीपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ई-मूल्यांकन प्रणाली नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच सहसंचालक, नगर रचना, मूल्यांकन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्यामार्फत विकसित करण्यात आली आहे. नववर्षामध्ये नागरिकांना पारदर्शकपणे तत्पर सुविधा उपलब्ध करुन देण्याचा नोंदणी विभागाचा प्रयत्न आहे. या प्रणाली नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
''ई-मूल्यांकन संगणक प्रणालीमध्ये मिळकतीची माहिती भरल्यानंतर त्या माहितीआधारे अचूक मूल्य ठरविले जाते. त्यामुळे एकसमानता येणार असून, मूल्यांकनाचे प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे.''
- अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक
- अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक